Pages

Friday, 17 October 2014

उद्योजकता या विश्वविद्यालयातील माझे प्राथमिक धडे. - Article by कुंदन गुरव

स्वतःचा शोध घ्या.

'साहब जमीन आप के कंपनी के नाम हो गई` रजिस्ट्रारने कागदावर मोहर लावत सांगितले. माझ्या अंदमान द्वीपसमूहातल्या प्रोजेक्टसाठी १५ एकर जमिनीचं खरेदीपत्र आज झालं. या जमिनीत हर्बल प्लांटेशनच्या प्रोजेक्टची सगळी तयारी पूर्ण झाली. साईट ऑफिसमधून समुद्रकिनारा दिसतो, समुद्राकडे पाहत असताना आजपासून १५ वर्षांपूर्वी आमच्या कोकणातल्या घरात झालेला एक संवाद आठवतो, पाहा काही साम्य आढळतंय का?

`मी व्यापार करणार` असं म्हटल्यावर आमचे काका धाडदिशी उभे राहिले आणि अक्षरश: ओरडलेच, `आपला विटांचा कारखाना होता, गावातली जमीन विकावी लागली, आता तुम्ही व्यापार करा म्हणजे राहतं घरही जाईल. हा असा संवाद मराठी माणसासाठी काही नवीन नाही.` भली नोकरी करावी, गाठीला काही पैसे जमवावेत, कुठे एखादी एफडी करावी, जमल्यास गावी एखादं छोटेखानी घर बांधावं आणि निवांत जीवन जगावं हे अगदी सोपं आणि साध जीवनाचं गणित आपण शिकलो आणि शिकवत आलो.

आमच्या व्यापाराची पहिली पाच वर्षे अतिशय कठीण होती. आमच्या काकांची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. इलेक्ट्रॉनिक्स रिपेरिंगपासून कुरीअर कंपनीपर्यंत बरेच व्यापार पाच वर्षांत करून पाहिले. प्रत्येक वेळी बॅलन्सशीटला तोटाच आला.

३१ डिसेंबर १९९९ च्या रात्री सगळं जग नवीन शताब्दीच्या स्वागताला सज्ज झालं होतं, मी मात्र माझ्या कुर्ल्याच्या घरात माळयावर एकटाच बसलो होतो, बसलो होतो म्हणण्याऐवजी लपलो होतो म्हणायला हरकत नाही. व्यापार बुडीत निघाला होता, नवीन व्यापार म्हटला तर भांडवल उरलं नव्हतं, पतही गमावून बसलो होतो. नोकरी करण्याचा मार्ग तेवढा अजून खुला होता. मनाचा निर्धार होत होता नोकरीच करावी, सगळं कर्ज हळूहळू फेडावं, चारचौघांसारखं सरळ जीवन जगावं, अजून किती वणवण करायची, आणि एवढी मेहनत करून पदरी काय तर कर्ज, नामुष्की आणि मित्रपरिवाराच्या सहन न होणाऱ्या नजरा.

माझे बहुतेक मित्र नोकरीला लागले होते काहींना तर सरकारी नोकरी लागली होती. बाबांच्या मते ते सेटल झाले होते. विचारांचा नुसता कोलाहल चालला होता, उद्या पहिला बायोडेटा तयार करायचा आणि नोकरीच्या शोधाला लागायचं, असा विचार पक्का झाला.

आतला रक्तबंबाळ झालेला, अगदी हिरमुसलेला उद्योजक शेवटची धडपड करत काहीतरी कुजबुजत होता, `थोडा शांत हो, विचार कर, गेल्या पाच वर्षांचा आढावा घे` माझ्यातल्या उद्योजकाचं शेवटचं एकदा ऐकायचं मी ठरवलं. वही-पेन घेऊन पाच वर्षांतल्या अनुभवांचा जमाखर्च मांडायला बसलो, एक एक वर्ष, प्रत्येक व्यापार, फ्लॅशबॅकप्रमाणे समोर आला. पहिल्यांदाच मी स्वत:ला त्रयस्थाच्या नजरेने पाहत होतो. गवर्ष्ठि, हट्टी, चंचल, लोभी अशी अनेक रूपं माझी मला दिसली, मी असा आहे यावर विश्र्वासच बसेना. माझे अनेक निर्णय कसे आत्मघातकी होते हे लक्षात आलं.

स्वत:तले दोष पाहनू दु:ख होण्याऐवजी आत्मविश्वास वाढत होता, विषण्णता दूर होऊन नवी उमेद दिसत होती. नोकरीचा विचार पळून गेला. मला काय करू नये हे कळंत होतं. त्या रात्री उद्योजकतेच्या काही नैसर्गिक तत्त्वांचा जणू साक्षात्कार झाला. हा साक्षात्कार माझ्यातला मीच घडवत होतो. रात्री युरेका, युरेका ओरडावेसे वाटले. कदाचित आरडलोदेखील असेल. नव्या शतकाच्या जल्लोषात ते इतरांना कळलं नसेल. त्या एका रात्रीतल्या स्वपरिचयाच्या जोरावर आजपर्यंतचा प्रवास सुरू आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर, इंदौर आणि अंदमान येथे बिझनेस कंसल्टिंग, हेल्थ सप्लिमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असे व्यापार चालू आहेत.

अजून स्ट्रगल आहेच पण गहाळ होऊन नोकरीचा विचार मात्र मनात येत नाही. लोकांच्या नजरेत भरावं एवढं यश काही अजून प्राप्त झालं नाही, पण प्रवास चालू आहे, अजूनही काही मित्र सशंक नजरेने पाहतात, वेळ प्रसंगी सल्लाही देतात. आता सवय झालीय.

त्या रात्री मला उमगलेली महत्त्वाची गोष्ट:

अॅक्शन / रिफ्लेक्शनचे तत्त्व

आत्तापर्यंत व्यापारात कृतीला महत्त्व देऊन जे पुढे येईल त्यावर कृती करत जाणं हेच मला माहिती होतं. `केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे` हा समर्थांचा उपदेश संदर्भ समजून न घेताच मी पळत होतो. कृतीनंतरचा परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे की नाही याचा कधी विचारही केला नाही. अपेक्षित परिणामांच्या दिशेने कृती करायची की कृती करून परिणामांची अपेक्षा करायची यातला नंतरचा मार्ग मी नेहमी स्वीकारला. इतर काय करतात आपणही तसंच करू, त्यांना नफा होतो ना मग आपल्यालाही होईल. माझे सुरुवातीचे काही व्यापार तर इतरांचा व्यापार चांगला चाललाय ना आपणही करून पाहू. बाह्य जगात आज काय चालतंय, कशाला जास्त मागणी आहे त्या गोष्टींचा आपण व्यापार करायचा, कुणी म्हटलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरमसाट पैसा आहे. आम्ही दुकान उघडलं, अरे कुरीअरमध्ये जास्त भांडवल लागत नाही आणि एकदा सेट झाला की पैसाच पैसा, की आमची कुरीअर कंपनी सुरू झाली. तब्बल पाच वर्षे बाह्य जगावर लक्ष केंद्रित करून अज्ञानाच्या पायावर व्यापाराची इमारत उभारत होतो, ती थोडी उभी राहायची आणि माझ्या डोळयांसमोर कोसळायची. पुन्हा नवीन प्रयत्न, नवीन कृती, नवीन उयापार हे दृष्टचक्र पाच वर्ष चाललं.

`बहु हिंडता सौख्य होणार नाही। शिणावे परी नातुडे हित काही।।विचार बरे अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवी वस्ती कीजे।`

त्या रात्री समर्थांचा हा श्लोक डोळयासमोर चमकला. या श्लोकाचा कुणी कसा अर्थ लावेल हे प्रत्येकाच्या मन:स्थिती, परिस्थिती आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. पण माझ्या त्या परिस्थितीत मला समजलेला अर्थ मला आजपर्यंत मार्गदर्शक ठरला. बाह्य जगाकडे पाहून जीवनाची वाटचाल केल्यास काही प्राप्त होणार नाही. जोपर्यंत स्वत:च्या अंतराचा शोध घेत नाही तोपर्यंत तुझ्या अस्तित्वाचं कारणच कळणार नाही. आता माझी शोधमोहीम सुरू झाली.

नव्या व्यापाराची नव्हे तर मी व्यापार का करावा याची. अंतर्मुख होऊन जेव्हा स्वत:ला एक मूलभूत प्रश्न विचारला तो म्हणजे माझ्या अस्तित्वाचे कारण काय? अनेकांना हा प्रश्न आध्यात्मिक वाटेल, उतारवयात विचारायचा प्रश्न, भौतिकातून अध्यात्माकडे वळताना विचारायचा प्रश्न. अनेकांना हा प्रश्न उतारवयात पडतो कारण त्यांनी हा प्रश्न योग्य वेळी विचारलेला नसतो.

स्वत:ला प्रश्न विचारणं आणि प्रश्न पडणं यात आयुष्य जगणं आणि आयुष्य घडवणं यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे. योग्य वेळी योग्य प्रश्न जर स्वत:ला विचारले नाहीतर आयुष्यात अनेक प्रश्न पडतात. पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देत जगणं म्हणजे आयुष्याला प्रतिउत्तर देत जगणं अशा लोकांबरोबर आयुष्य घडत जातं, हे लोक आयुष्य घडवत नाहीत.

माझ्या वाचनात आलेलं एक खूप महत्त्वाचं वाक्य मला इथे आठवलं `Quality of your life will depend of the quality of questions that you will ask` आणि मग अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, कोणताही नवा व्यापार सुरू करायचा असताना माझ्यातला जोश काही दिवसांत कमी का होतो? व्यापाराने माझ्या भौतिक गरजा पूर्ण कराव्यात, भरपूर पैसा कमवून द्यावा, प्रसिद्धी द्यावी, मानमरातब द्यावा अशा अपेक्षा ठेवल्यामुळेच काही काळात जोश थंडावतो हे लक्षात आलं. मग अनेक व्यापार गेल्या ५०० वर्षांपासून सुरू आहेत त्यांचे संस्थापक आता या जगात नाहीत तरीही ते व्यापार तेवढ्याच जोशात कसे चालले आहेत? हे आणि असे अनेक प्रश्न डोक्यात फिरू लागले.

मला कळून चुकलं, `तुला जे माहीत आहे तेच तुला माहीत आहे, जे तुला माहीत नाही ते तुला माहीत नाही, जेवढं माहीत करून घेशील तेवढ्याचं पटीने माहीत असलेलं वाढत जाईल. आणि माझा प्रवेश झाला एका अशा विश्वविद्यालयात जिथे पदवीदान सभारंभच नाही. आज दहा वर्षांच्या अभ्यासानंतर मी त्या विश्वविद्यालयाला उद्योजकता म्हणतो. स्वागत आहे तुम्हा सर्वांच या विश्वविद्यालयात.

उद्योजकता या विश्वविद्यालयातील माझे काही प्राथमिक धडे

तुम्ही कुठे आहात (फाइंड मी बटण)

हल्ली आपण GPRS वापरतो किंवा मार्ग शोधण्यासाठी Google Map वापरतो. Google Map मध्ये Find Me किंवा Current Location असं बटण असतं, हे दाबलं की संगणक आपल्याला झूम आऊट करून अंतराळात घेऊन जातो. संपूर्ण जगाचं दर्शन एका नजरेत घडवतो आणि मग हळूहळू झूम इन करत आपण ज्या ठिकाणी आहोत ती जागा नकाशावर दाखवतो. एकदा आपण कुठे आहोत हे कळलं की पुढचा मार्ग शोधणं सोपे होते. व्यापार सुरू करण्यापूर्वी स्वत:चा शोध घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.

स्वत:बद्दलचं अज्ञान व्यापारात घातक ठरू शकतं, व्यापारात फक्त तुमचा पैसा लागलेला नसतो. तुमचा वेळ, तुमचं आणि परिवाराचं भविष्य, तुमच्या सहकाऱ्यांचं करिअर अशा अनेक गोष्टी पणाला लागतात. गमावलेला पैसा पुन्हा कमावता येतो पण या अदृश्य गोष्टी गमावल्या तर परत आणणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे व्यापारात पदार्पण करण्यापूर्वी एक स्वल्पिवराम घेऊन स्वत:चा शोध घेतल्याने तुमच्या उद्योगाचाच नाही तर संपूर्ण भविष्याचा पाया मजबूत होईल. असा पाया ज्यावर कितीही उंच इमारत उभी करू शकाल.

स्वत:चा शोध घेणं म्हणजे स्वत:बद्दलची जागरूकता निर्माण करणं. जागरूकतेला व्यापारी जगात खूप महत्त्व आहे. जागरूकपणे केलेल्या गोष्टी अपेक्षित परिणाम देतात आणि जरी अपेक्षित परिणाम नाही आले तरी त्याची जबाबदारी घेणं सोपं होतं. याउलट अज्ञानाने केलेलं कार्य चुकीचे परिणाम देतात आणि मग दोष कुणाला द्यायचा याच्यावर लक्ष केंद्रित होतं. जबाबदारी न घेता दुसऱ्यावर अथवा परिस्थितीवर दोष टाकला तर सुधारणा काय कराव्यात हे कळत नाही. पुन्हा पुन्हा त्याच चुका होण्याची शक्यता असते.

So press ‘find me’ button today. It will open whole new world of opportunities for you, there are such small, but important lessons in the university with no graduation ceremony.

I will be happy to share more my thoughts. Till then keep discovering yourself.

- कुंदन गुरव .............................

या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 



No comments:

Post a Comment