“We can not go back in our past and start new beginning but we can think about, dream about and ultimately envision our own future so that we have a brand new ending."
२०० उद्योजकांच्या समूहासमोर हे वाक्य मी फेकले खरे, पण अर्ध्यापेक्षा अधिक लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव असहमतीदर्शक होता. त्यांच्या असहमतीचे कारण मला माहीत होते. कदाचित त्या कारणामुळेच हा सेमिनार आयोजित केला होता. हे सर्व उद्योजक महाराष्ट्रातील एका नामांकित आणि पंचतारांकित MIDC मधील होते. गेल्या दशकात या MIDC ने अतिशय भयावह असे अनुभव घेतले होते. इतले बहुतेक उद्योजक हे एका बलाढय उद्योग समूहासाठी OEM किंवा टियर वन सप्लायर होते. बाजारातील चढ-उतारामुळे या समूहाने Production बंद केल्यात जमा होते. अर्थव्यवस्थेतील मंदी आणि जवळपासच्या छोटया शहरांत झालेल्या विकासामुळे तयार झालेली स्पर्धा.
अशा या परिस्थितीत आजच्या समस्या एवढया मोठया वाटत होत्या की, भविष्याचा विचार करणे अथवा भविष्य घडवणे निरर्थक वाटत असावे. उद्योजक म्हणून कार्य सुरू केले की, प्रत्येकाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागतेच.जेव्हा आजच्या समस्या आभाळाहूनही मोठया असतात. अशा वेळी भविष्याचा विचार अथवा स्वप्न निरर्थक वाटतात खरे, पण याच वेळी भविष्याच्या सकारात्मक चित्राची सर्वात जास्त गरज असते. उद्योजक म्हणून कार्यरत असताना आपण सामोरे जात असणाऱ्या बहुतेक समस्यांचे कारण कुठे न कुठे भविष्याच्या सकारात्मक परिस्थितीचे चित्रण न करण्यातच दडलेले असते यावर माझा आता ठाम विश्वास बसला आहे.
असाच एक सेमिनार संपवून मी प्रश्नोत्तराच्या तासाला सामोरा जात होतो. त्या उद्योजकांच्या समूहात एक प्रौढ गृहस्थ बसले होते, त्यांनी उभे राहत मला प्रश्न टाकला, ``साहेब, तुम्ही सांगता आहात ते सगळे ऐकायला चांगले वाटते पण तुम्हाला उद्योगातील काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स माहीत नाहीत, सर्वात प्रथम तर आम्हाला चांगले कामगारच मिळत नाहीत, त्याचे काय?``
हा प्रश्न तसा माझ्यासाठी नवीन नव्हता, कारण रोज अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. शांतपणे प्रश्न ऐकल्यावर मी त्यांना विचारले, ``साहेब तुम्ही मला गेले दोन तास ऐकता आहात, मी आजपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केलेली प्रोजेक्टस् ही आपण ऐकलीत, त्यातील काही ब्रॅण्ड आपण स्वत: वापरलेत आणि अनुभवले आहेत, तुम्ही मला चांगल्या कामगारांमध्ये मानता का?`` त्याचे उत्तर हो म्हणून आले. मी म्हटले, ``या दोनशे लोकांसमोर मी आपणास विचारतो मी जर आपल्या कंपनीत सांगाल त्या वेतनावर काम करायला तयार झालो तर आपण मला नोकरी द्याल का?`` थोडया संकोचाने पण ते म्हणाले, ``आनंदाने``. मग मी त्यांना विचारले, ``साहेब. मला सांगा तुमच्याबरोबर काम केल्यावर पाच वर्षांत मी कुठे असेन? माझ्या लाईफ मध्ये असे काय काय घडले असेल?`` उत्तर लगेच आले, ``तुमची प्रगती झाली असेल`` पण या उत्तराची फोड करून सांगा म्हटल्यावर मात्र उत्तर आले नाही.
मी म्हटले, ``साहेब माझे सोडा पण आपली कंपनी पुढच्या पाच वर्षांत कुठे असेल, कशी असेल याचा आराखडा आहे का आपल्याकडे.`` प्रांजळपणे नकारार्थी मान डोलवत साहेब खाली बसले पण बसताना अंतर्मुख होऊन विचारमग्न झाले. साहेबांची माफी मागत मी समूहाशी संवाद चालू ठेवला. चांगल्या कामगारांना हवे असते भविष्य, उद्योजक म्हणा अथवा लीडर म्हणा त्यांना तुमच्याकडून उद्याच्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असतात. ही उत्तरे जर समर्पक द्यायची असतील तर बिजनेस प्लानची गरज पडते पण हा बिजनेस प्लान भविष्याच्या सकारात्मक चित्रावाचून बनूच शकत नाही.
बँकेला देण्यासाठी अथवा अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी का लोक बिजनेस प्लान बनवून घेतात जर हा बिजनेस प्लान भविष्याच्या सकारात्मक चित्रावर आधारित नसेल तर दीर्घ कालावधीमध्ये घातक ठरतो. उद्योजकता या विश्वविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शिकलेल्या काही प्राथमिक धडयांपैकी एक म्हणजे `भविष्याची सकारात्मक प्रतिमा` तयार करण्याची कला. यालाच आजच्या जगात व्हिजन शोधणे अथवा बनवणेही म्हणतात. आज व्हिजन हा शब्द अतिशय सर्रासपणे औद्योगिक जगात वापरला जातो. अनेकांना व्हिजन म्हणजे प्रेरणा देणारे एक वाक्य वाटते तर काहींना कार्यालयात, व्हिजिटिंग कार्डवर अथवा ब्रोशरवर लिहायचे फॅन्सी वाक्य वाटते.
शंभराहूनही अधिक व्हिजन वर्कशॉप केल्यावर आजही हे वर्कशॉप करण्यापूर्वी माझ्या मनात भीती असते. प्रसवाच्या वेळी स्त्रीला होणाऱ्या यातना आणि डॉक्टरांनी घ्यायची काळजी या दोन्हीचा समावेश व्हिजन शोधण्याच्या मोहिमेत असतो. बालकाच्या वाढीतला त्याचा जन्म जितका महत्त्वाचा टप्पा तसाच उद्योगाच्या वाढीत व्हिजनाचा शोध अथवा बनवणे. व्हिजनचे महत्त्व फक्त उद्योगातच नाही तर या जगात प्रत्येक गोष्टीला लागू आहे. व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, देशांच्या आणि उद्योगाच्या प्रगतीमध्ये व्हिजनचा मूलभूत सहभाग आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतात जी व्हिजनचे महत्त्व पटवून देतात.
मराठयांचा इतिहास जर पाहिला तर राजा रामदेवराय यादवापासून ते शिवाजींच्या जन्मापर्यंतचा काळ हा अतिशय हलाखीचा, नामुष्कीचा आणि असह्य होता. राजा आणि प्रजा दोघेही आजच्या समस्यांशीच झुंजत होते. अत्याचार, बलात्कार, लूट आणि अतिरेक या सामान्य गोष्टी झाल्या होत्या. यातून आपली कधी सुटका होऊ शकेल, असे लोकांनाही वाटत नव्हते. लाचारीच जीवन जगावे अथवा आत्महत्या करावी अशा प्रकारचे जगणे होते. हा प्रकार तोपर्यंत चालला जोपर्यंत जिजाऊने भविष्याचे सकारात्मक चित्र शिवाजीच्या मनावर कोरले नाही.
स्वराज्याचे स्वप्न उरी घेऊन महाराजांनी घोडदौड सुरू केली. परिस्थिती काही अचानक बदलली नाही. अनेक जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. प्रत्येक वेळी दंडातील ताकद कामी आली असे नाही, पण एक ताकद कायम साथ देत होती ती म्हणजे स्वराज्याचे व्हिजन. 200 वर्षे गुलामीत राहिलेल्या समाजाला जागरूक करायला, मुजरे करायला सोकावलेल्या मनगटात शौर्याचा संचार घडवायला जर काही कामी आले तर स्वराज्याचे व्हिजन. स्वराज्याच्या व्हिजनच्या जोरावर, तुटपुंज्या साधनांच्या जोरावरही स्वराज्य घडलं. या व्हिजनला प्रत्यक्ष रूप देणारे अमर झाले. जन्म-मरणाचा फेरा चुकला. एक स्वाभिमानी समाज पुन्हा ताठ मानेने उभा राहिला.
जातीयवाद, प्रांतवाद, स्वार्थ आणि गुलामगिरीतील ब्रिटिश काळातील भारताला एकत्रित होऊन लढायला जर कुणी भाग पाडले असेल तर ते स्वातंत्र्याच्या सकारात्मक चित्राने. एकच व्हिजन घेऊन गांधी, सावरकर, भगतसिंग आणि सुभाष बाबू वेगवेगळया पध्दतीने लढले. असह्य अशा वेदना सहन करूनही लढत राहायची ताकद होती कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अजून काही तरी खूप महत्त्वाचे करायचे बाकी होते. जोपर्यंत व्हिजन डोळयासमोर होते, आजच्या समस्या लहान वाटत होत्या. मार्ग सापडत होते, कोंडी फुटत होती. स्वातंत्र्य मिळाले आणि देशाने नवीन व्हिजन शोधलेच नाही म्हणून पुन्हा वाटचाल लाचारीची, स्वार्थाची, प्रांतवादाची आणि नैराश्याची झाली. पुन्हा व्हिजन शोधण्याची गरज आज देशाला आहे.
आपण म्हणाल यात कॉर्पोरेट चर्चा कुठे आहे? ज्याप्रमाणे अनेक उद्योजक आजच्या समस्यांवर लक्ष केंद्रित असतात व अनेक यत्न करूनही मार्ग सापडत नाही, किंवा जर आणखी प्रगती केली तर माझ्यासमोर येणारी आव्हाने मी कशी पेलणार, असा विचार करत असतील तर त्यांनी वरील दोन्ही उदाहरणांचा सखोल अभ्यास करावा, उत्तर सापडेल व्हिजनच्या शोधातच. व्हिजन या विषयाचा अभ्यास करताना माझा ठाम विश्वास झालाय, आपल्यापैकी प्रत्येक जण व्हिजनने pregnant आहे. या जगात आल्यावर त्या व्हिजनला प्रत्यक्ष रूप देणे हाच मुक्तीचा एकमेव मार्ग.
व्हिजनला प्रत्यक्ष रूप देण्याची संधी ही प्रत्येक उद्योजकाकडे आहे. उद्योजकतेच्या विश्वविद्यालयातील हा आणखी एक महत्त्वाचा धडा. असे अनेक काही धडे आपणासमोर पुढील काही लेखात आणण्याची इच्छा आहे. तोपर्यंत तुमच्या उद्योगाच्या भविष्याचे सकारात्मक चित्र रंगवा.
- कुंदन गुरव .............................
या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.
- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546
No comments:
Post a Comment